कोल्हापूर : 'खिळे मुक्त झाडांचं कोल्हापूर' या मोहिमेची आजपासून शहरात सुरुवात झालीय. या मोहिमेच्या माध्यमातून झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढले जात आहेत. कोल्हापूर शहरातील सामाजिक संस्था आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर शहरातील अनेक झाडांवर आपल्या जाहिराती करण्यासाठी अनेकांनी खिळे ठोकले आहेत. मात्र, त्यामुळे झाडांना इजा पोहोचत आहे. कोल्हापूर शहरात अजून तरी खूप मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. मात्र, त्या झाडांना खिळू ठोकून जखमी केलं जातं. अशावेळी ही झाडे वर्षानुवर्षे अशीच जिवंत राहावी यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
कोल्हापूर शहरातील या अनोख्या मोहिमेमध्ये पर्यावरण प्रेमी, अनेक सामाजिक संस्था त्याचबरोबर सर्वसामान्य कोल्हापूरकरांचा सहभाग आहे. येत्या काही दिवसात कोल्हापूर शहर हे खिळेमुक्त झाडांचे शहर झालेले आपल्याला पाहायला मिळेल. आज स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, शहराचे आमदार चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांनी झाडांना ठोकलेले खिळे काढले.
यानंतर एकही खिळा झाडाला ठोकला जाणार नाही यासाठी सर्व कोल्हापूरकर सतर्क राहणार आहेत. या मोहिमेत कोल्हापूर महापालिकेची देखील मोठ्या प्रमाणात मदत घेतली जाणार आहे. सरकारी यंत्रणा वापरून एका दिवसात खिळेमुक्त कोल्हापूर करता आले असते. मात्र, नागरिकांचा सहभाग घेतला तर नागरिकच कुणाला खिळे ठोकू देणार नाहीत. यासाठीचा हा सगळा प्रयत्न सुरू झाला आहे.
संबंधित बातमी :
कोल्हापुरात नवीन वर्षात नवी मोहीम, 'खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर' मोहिमेत सहभाग व्हा : सतेज पाटील