उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या गावातल्या विरोधी गटाचे 19 पैकी 17 अर्ज बाद झाल्याचा प्रकार घडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसुरचा हा प्रकार आहे. हा राज्यातल्या सत्तेचा दुरूपयोग आहे, असा आरोप होत असला तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसार अर्ज बाद केल्याचा दावा केलाय. पण कॅमेरासमोर बोलायला नकार दिला आहे. दरम्यान विरोधी गटाने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 अंतर्गत होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बलसुर येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या विरोधी गटाचे 19 पैकी 17 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची एक हाती सत्ता येणार आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध कारणांनी हे अर्ज बाद केले. त्यात मतदार यादीतील अनुक्रमांक आणि प्रभाग क्रमांक चुकीचा असणे, अभी साक्षी वर सही नसणे, अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र नसणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, परिशिष्ट दोनची नोटरी नसणे असा विविध कारणाने सदरील अर्ज बाद ठरवले आहेत. कागदपत्र पूर्तता नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादीच्या पॅनलकडून घेण्यात आला होता. यावर निकाल देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 17 अर्ज बाद ठरवले. यात सुरेखा बब्रुवान चव्हाण, देविदास बब्रुवान चव्हाण, मुर्टे सुरेश पंढरीनाथ, साखरे अशोक विश्वनाथ यांचा समावेश आहे. निर्देशन पत्र अवैध ठरलेल्या सतरा उमेदवारांनी औरंगाबाद येथील हायकोर्टात अपील दाखल केल्याचे सूत्रांकडून समजते. हायकोर्टाने अपील दाखल करून घेतल्यास हायकोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.


Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर... उमेदवारांना मजेशीर चिन्हं!


बलसुर येथील पाच प्रभागात पंधरा उमेदवारांसाठी निवडणूक होणार होती. या पंधरा जागेसाठी एकूण 43 अर्ज दाखल झाले. यापैकी 17 नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने फक्त 26 नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेरकर यांनी जाहीर केले. हे अवैध ठरलेले सतरा नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या विरोधी गटातील बब्रुवान चव्हाण आणि सुरेश मुर्टे गटाचे होते. या गटाने दाखल केलेल्या 19 नामनिर्देशन पत्रापैकी 17 फॉर्म अवैध ठरल्याने बिराजदार गटाचा मार्ग सुकर झाला आहे. फक्त वार्ड क्रमांक चार आणि पाच येथील दोनच अर्ज वैध ठरल्याने याच ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता असून इतर ठिकाणी विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.


Gram Panchayat | उस्मानाबादच्या बलसुर गावात सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाचे 19 पैकी 17 अर्ज बाद