लातूर: निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज्यात घराणेशाहीला ऊत आला आहे. सर्वच पक्षातील दिग्गज आपल्या राजकीय वारसदारांसाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. पण, कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र एक घर, एक पद या तत्वाचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे.


आपण पदावर असेपर्यंत आपल्या कुटुंबातील कुणीही निवडणूक रिंगणात उतरणार नाही,  असं निलंगेकर यांनी जाहीर केलं आहे.

कार्यकर्त्यांनी त्यांचे बंधू अरविंद पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पण, संभाजी पाटील यांनी ही मागणी फेटाळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घरात किंवा कुटुंबीयांना निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसंच वक्तव्य केलं होतं. त्याचं समर्थन संभाजी पाटील यांनी केलं आहे.

संभाजी पाटील निलंगेकर यांनी नुकताच निलंगा इथं कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी संभाजी पाटील यांचे बंधू अरविंद पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली.

मात्र संभाजी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाची आठवण करत, आम्ही घरात एक पद असताना दुसरे घेणार नाही, अशी घोषणा केली.