मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या पुढे फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.


वंदे मातरम् हे आपले  राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. 1875 मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होतं. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. 


भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. 1800 साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला आहे. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल असेही मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.


सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. "आज मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा केली. शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.