नागपूर : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे एबीपी माझा सोबत बोलताना भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. लॉकडाऊनच्या काळात हजारो वंचित आणि गरजूंना जेवणाची सोय करणाऱ्या आपल्या संकल्प संस्थेच्या उभारणीची आठवण सांगताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत कमालीचे गहिवरले. या कष्टकरी जनतेच्या काय अडचणी असतात आणि आज त्यांचे काम, व्यवसाय बंद झाल्याने लॉकडाऊनमध्ये ते काय अडचणी सोसत असतील याची जाणीव ठेवूनच संकल्प आज गरजूंना ताजे अन्न पुरवत आहे असे सांगताना नितीन राऊत यांचे डोळे पाणावले.


एकेकाळी नागपूर, मुंबई सह संपूर्ण राज्यात कापड गिरण्या संकटात घेऊन तिथला मजूर वर्ग देशोधडीला लागला होता. घरातल्या आया बहिणींना इतरांकडे धुणे भांडी, भाजी विकणे असे कामे करावे लागले होते. त्यातीलच एक परिवार त्यांचा स्वत:चा होता. मुंबईत त्याकाळी मिल मजुरांच्या मुलांमधून गँगस्टर उभे झाले, मात्र नागपुरात त्या संकटकाळी मिल मजुरांच्या मुलांनी धीर न सोडता नितीन राऊत यांच्यासह संकल्प ही संस्था उभारली होती. त्याकाळी सोसलेल्या वेदना लक्षात ठेवूनच आज संकल्प ही संस्था हजारो गरजुंना दोन वेळचे जेवण त्यांच्या वस्तीत जाऊन पुरवत आहे, असं नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

विजेचे दर वाढण्याची शक्यता कारण केंद्राचे पॅकेज हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने!' व्याजावर पैसा देणार असं दिसतंय, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. तसेच सध्या अॅव्हरेज बिलिंगमुळे महाराष्ट्रात स्टाफचे पगार करणे कठीण झाले आहे, असंही ते म्हणाले.
उत्तर नागपुरात संकल्प संस्थेचे कम्युनिटी किचन आहे. एक भावनिक नाळ जुळली असल्या कारणाने या कामात आज चक्क नितीन राऊत यांच्या रूपाने 'व्हिआयपी मदतनीस' बघायला मिळाला. भाजीची मोठमोठ्ठी भांडी, शेकडो किलोचा भात, असंख्य टेबल्सवर त्याची पॅकिंग करणारी मंडळी तर लोकांपर्यंत अन्नाचे क्रेट पोहोचवण्यासाठी गाड्या भरण्याचे काम इथं सुरु असतं. या सर्व कामात नितीन राऊत हातभार लावताना दिसतात.