Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले की, आज जाहीर सभा झाली. सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होते. माझं नाव नाही घेतलं, मग भाषण करणार तरी काय? बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. त्यांनी काल चर्चा करताना त्यांनी सगेसोयरेंचा मुद्दा घेतलाच नाही. त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचे दिसते. सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणतात, मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा असं म्हणतात, तर मग बीडमध्ये जे काही घडलं ती जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबूली आहे का? अशी विचारणा केली. 


छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही


जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल, ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीत, तर बाहेर राहतात. 12 इंच छाती आहे, ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. कोणी आरे म्हटले तर कारे कोणीतरी करणार आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही, असा टोला त्यांनी लगावला. 


क्युरेटिव्ह दाखल झाल्याने दिलासा मिळाला 


छगन भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे.  मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशीच आमची मागणी आहे. क्युरेटिव्हच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला चर्चा करता येईल. सुप्रीम कोर्ट निर्माण केलेला अडथळा दूर करेल, असे ते म्हणाले. 


मनोज जरांगेंनी अॅक्शन प्लॅन सांगितला!


दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील बीडमधील जाहीर सभेत म्हणाले की, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कूच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही, मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेत जायचं, शांततेत यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. 



तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही


बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं. सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या