पंढरपूरः रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना डावलून विठ्ठलाचं दर्शन घेणाऱ्या सुभाष देशमुखांना अखेर माफी मागावी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. मात्र भाविकांची भलीमोठी रांग असताना देशमुखांनी रांग डावलून दर्शन घेतलं होतं.
राज्यातील मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर सुभाष देशमुखांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आलं आहे. देशमुख मंदिरात दर्शनासाठी गेले असता भाविकांची भलीमोठी रांग होती. मात्र भक्तांना ताटकळत ठेवून सुभाष देशमुखांना दर्शनाची संधी देण्यात आली. त्यामुळं भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर भाविकांचा पवित्रा पाहून सुभाष देशमुखांनी प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर माफी मागितली आहे.