मुंबई : कॅबिनेटमधून बाजूला ठेवायचं असेल तर जी खाती दिली जातात, ती खाती मी मागितली. या खात्यांमार्फत मला चांगलं काम करण्याची इच्छा आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मला महाराष्ट्रातील पर्यटनाची क्षमता दिसली. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही पाहण्यासारखं आहे. या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझ व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.


मुंबईतील नाईटलाईफ ही खूप सोपी संकल्पना आहे. मुंबईत कामाचा काही वेळ नसते. तसेच देशाच्या विविध भागातून लोक मुंबई पाहण्यासाठीही येत असतात. त्यांना रात्री-अपरात्री जेवणाची किंवा इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी मी नाईटलाईफची संकल्पना आणली. यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल. अनेकांना रात्रीची मुंबई अनुभवता येईल. वीकेंडला मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर या सोई त्याठिकाणी उपलब्ध असाव्यात, म्हणून नाईट लाईफ गरजेची आहे. जगभरातील इतर देशांमधील अनेक शहरं रात्रंदिवस जागी असतात. मग आपण मुंबईवरही विश्वास टाकला पाहिजे. मुंबईकर रात्रभर नुसता गोंधळ घालणार नाहीत. मुंबईकरांवर विश्वास न ठेवणे हा मुंबईकरांवर अन्याय आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.


वातावरणातील बदलांमुळे मोठं आव्हान पर्यावरण खात्यासमोर आहे. पर्यावरण खात्यामार्फत प्रत्येक नागरिकामध्ये वातावरण बदलांबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डोंबिवली येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, उद्योगांना पर्यावरणासंबंधीच्या नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचं पालन न झाल्यास संबंधित कंपन्यावर कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणाची कोणतीही हानी सहन केली जाणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.


मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, अशा घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशा घटना रोखण्यासाठीही आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मात्र विकृत मानसिकता बदलनेही तितकच गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विविध माध्यमांतून स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून प्रयत्न सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या