Aaditya Thackeray :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ई़डीने (ED) कारवाई केली आहे. या कारावाई संदर्भात प्रसारमाध्यमांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, नौदलाच्या कार्यक्रमात राजकीय भाष्य मी करणार नाही. ही जागा राजकारणावर भाष्य करण्याची नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. यासंदर्भात मी सभागृहात बोलणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. नौदलानं आयोजीत केलेल्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता, त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.


दरम्यान, देशाचं रक्षण करणं ही भाग्याची गोष्ट असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्राचे नौदलासोबत एक वेगळं नात आहे. नौदलाची खूप मोठी परंपरा आहे. प्रत्येकाला आपल्याला अभिमान वाटेल असे नौदलाचे काम असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.


अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. 


ईडीने प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: