महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेबाबत चर्चा आणि बैठकीचं सत्र सुरु असतानाच, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राज्यातील सत्तापेचात मोठा ट्विस्ट आला होता. स्थिर सरकारसाठी एकत्र आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांनी बंड केल्याचं स्पष्ट झालं. मात्र राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर दोन दिवस अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. अखेर 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परिणामी बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला आणि 80 तासात सरकार कोसळलं.
या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलं. मात्र ही भेट संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने झाली. संजय शिंदे हे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह सोहळा सोलापुरात संपन्न झाला. यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी पवार आणि फडणवीस यांनी एकाच कोचवर बसून मनसोक्त गप्पा मारल्या.
अजित पवार जेवण करुन पुण्याकडे तर देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना झाले. मात्र या लग्नात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिटांच्या गप्पांचीच चर्चा अधिक रंगली.