सोलापूर : एमआयएमचा सोलापूर शहराध्यक्ष तौफिक शेख अखेर अटक करण्यात आली आहे. जागा बळकावण्यासाठी रोहित यादव या तरुणाचं अपहरण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करत पोलिसांनी चौघांना जेरबंद केलं होतं. मात्र तौफिक पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आता मुख्य सूत्रधार असलेला एमआयएमचा अध्यक्ष तौफिक शेखलाही अटक करण्यात आली आहे. तौफिकला सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता.
रेल्वे लाईन परिसरातील मोक्याची जागा रिकामी करण्यासाठी तौफिक शेख याने यादव कुटुंबाला जेरीस आणलं होतं. पण यादव कुटुंबीय जागा देण्यास तयार नसल्यानं तौफिक शेखनं यादव कुटुंबातल्या तरुणाच अपहरण केलं. रोहित यादवचं स्कॉर्पिओमधून अपहरण करत त्याला परराज्यात नेण्यात आलं. कर्नाटकातल्या तीन चार शहरात फिरुन मिरजवळ नेऊन त्याला मारहाणही करण्यात आली. रोहित यादवनं चलाखी करुन पोलिसांना मेसेज पाठवला. सोलापूर पोलिसांनी मेसेजचा आधार घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रोहित यादवची सुटका करुन चौघांना घटनास्थळावरुनच चारचाकी वाहनासह अटक केली. तौफिक शेख मात्र दुसऱ्या गाडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
सदर बझार पोलीस ठाण्यात तौफिक शेखसह त्याच्या चार साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तौफिकच्या शोधासाठी सोलापूर पोलिसांची विशेष पथकं पुणे आणि कर्नाटकात रवाना झाली होती.
तौफिक शेखची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. मटका, दारु, जुगार अड्डे, खंडणी, मारामारी आणि सामाजिक शांतता भंग केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीला एमआयएमच्या असदुद्दिन ओवेसी यांनी पक्षात महत्वाच स्थान दिलं आहे. तौफिक शेख पूर्वी काँग्रेसचा नगरसेवक आणि सुशीलकुमार शिंदे यांचा कट्टर समर्थक होता. पण तौफिक शेखने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आले आहे.