मुंबई : भारतीय संविधानाचा विचार जनमाणसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने (अंनिस) संविधानानिमित्त उद्यापासून म्हणजे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारीदरम्यान संविधान बांधिलकी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. यासाठी 'अंनिस'च्या युवा कार्यकर्त्यांकडून संविधान जागर यात्रा काढली जाणार आहे.


'अंनिस'च्या युवा कार्यकर्त्यांकडून मुंबई आणि नागपुरातून मध्यप्रदेशातील महू आणि औरंगाबाद दरम्यान संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान ही यात्रा निघणार आहे.

'अंनिस'च्या वतीने 2007 पासून संविधान बांधिलकी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या अंतर्गत संविधान संवाद सभा, संविधान अभिवादन फेरी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

दरम्यान संविधान जागर यात्रेचं उद्घाटन नागपुरात दीक्षाभूमी येथे होणार आहे. तर मुंबईत चैत्यभूमीवर होणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या रॅलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.