औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम राज्यात 100 जागा लढवण्यासाठी इच्छूक आहे. एमआयएमने आपल्या 100 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. लवकरच त्यावर बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीला एकत्र घेण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि एमआयएम आघाडी करुन लढले होते. विधानसभा निवडणूकही एकत्र लढण्यासाठी एमआयएम इच्छूक आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएम राज्यातील 100 जागा लढवण्यासाठी इच्छूक आहे. या जागांची एक यादी प्रकाश आंबेडकरांना नागपूरमध्ये दिली असल्याची माहिती एबीपी माझाला एमआयएमच्या खास सूत्रांकडून मिळाली आहे.


मुस्लीम आणि दलित मतांचं मताधिक्य विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते, अशा जागा एमआयएमने लढवणार असल्याचं सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील काही जागा आहेत. याशिवाय ठाणे, मुंबई,सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड सह अन्य महाराष्ट्रातील 100 जागांची एक यादी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिली आहे.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दलित आणि मुस्लिमांची मतांची मोट बांधून महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्ना एमआयएमचा आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने 24 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये मुंबईमधून एका जागी आणि औरंगाबाद मध्य मधील जागेवर एमआयएमला यश मिळालं होतं.


आता वंचित बहुजन आघाडीच्या मतांच्या जोरावर आणि मुस्लीम बहुल भागातील मुस्लीम मतांच्या जोरावर एमआयएम अधिकाधिक जागा महाराष्ट्रात निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र शंभर जागा त्यांना मिळणार का? यावर अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.