सोलापूर : फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम असे शब्द जरी उच्चारले तरी मजा, मस्ती आणि टाईमपास अशाच गोष्टी लक्षात येतात. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आज कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. कधी काळी शाळा, महाविद्यालयात शिकणारे मित्र देखील संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करतात. या ग्रुपमध्ये गप्पा-टप्पा, चर्चा, मजा-मस्ती, टिंगल-टवाळकी याच्या पुढे जाऊन काही साध्य होताना दिसत नाही. मात्र याला काही जण मात्र अपवाद असतात. याच समाजमाध्यमांचा वापर करुन कोरोनाच्या काळात अनेकांनी गरजूंची मदत केली. सोलापुरात देखील असाच एक व्हॉट्सअॅप ग्रुप आपल्या कॉलेजमधील मित्राच्या मदतीला धावून आला. 


सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात 2000 ते 2005 साली शिक्षण घेतलेल्या मित्रांचा व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप आहे. 'दयानंद मुलांचे वसतिगृह' असे या ग्रुपचे नाव. सध्या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यात, राज्यात काम करत असलेले हे मित्र या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी हे महाविद्यालयातील मित्र एकत्रित येत असतात. दरवर्षी गेट टुगेदर, छोटे-मोठे कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत असतात. कोरोनाच्या काळात याच ग्रुपवर अनेक जणांच्या मदतीसाठी देखील प्रयत्न करण्यात आले. 




याच ग्रुपचा सदस्य असलेला आणि महाविद्यालयीन जीवनात मित्र असलेल्या एकाला म्युकरमायकोसिस झाल्याची माहिती ग्रुपमधील सदस्यांना मिळाली. अंत्यत खर्चिक असलेला हा आजार आपल्या मित्राला झाल्याची माहिती मिळताच या ग्रुपच्या सदस्यांनी मित्राच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. अवघ्या काही तासात ग्रुपमधील सदस्यांनी तब्बल दोन लाख दहा हजार रुपये जमा केले. कला क्षेत्रात आपलं नशीब आजमवताना संघर्ष करत असलेल्या मित्रास या ग्रुपच्या सदस्यांनी कठीण काळात मोलाची मदत केली आहे. 


दयानंद मुलांचे वसतिगृह या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मित्र एकत्रित आले आहेत. अगदी शेतकरी, कलाकार, उद्योजक, व्यापारी ते इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी अशा सर्वांचा समावेश या ग्रुपमध्ये आहे. दररोज विविध विषयावर बौद्धिक चर्चा ग्रुपमध्ये होत असते. तसेच समाजातील विविध घटक ग्रुपमध्ये असल्याने सर्व प्रकारच्या चर्चा या ग्रुपमध्ये रंगत असतात. संकटकाळात मित्रासाठी धावून आलेल्या या ग्रुपने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. 


दयानंद मुलांचे वसतिगृह ग्रुपचे सदस्य असलेले प्रशासकीय अधिकारी
शिवप्रसाद नकाते, (IAS), स्वप्निल पाटील, (IRS), अभयसिंह मोहिते, (उपजिल्हाधिकारी), 
डॉ. अजित थोरबोले, (उपजिल्हाधिकारी), रत्नाकर नवले, (पोलिस उपअधिकक्षक), प्रदीप उबाळे, तहसीलदार, शितलकुमार कोल्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक