सांगली : आईने पतीच्या निधनानंतर घरोघरी जाऊन चहा पावडर विक्री करण्याचा पतीचा व्यवसाय पुढे चालूच ठेवला. आपल्या तीन मुलींना शिकवणाऱ्या नयन पवार यांच्या धाकट्या मुलीला दहावीत 99.20 टक्के मार्क मिळाले आहेत.


नंदिता नितीन पवार असं या सांगली जिल्ह्यातील मुलीचं नाव आहे. ती ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेत शिकत होती. नंदिता ही शाळेत पहिली आली आहे. नंदिता दोन वर्षांची असताना तिचे वडील वारले. त्यानंतर तिन्ही मुलीची जबाबदारी आईवर पडली.

परिस्थितीशी दोन हात करत नयन पवार यांनी आपल्या पतीचा चहा पावडर विक्रीचा व्यवसाय कसाबसा पुढे चालवत तिन्ही मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी धडपड सुरुच ठेवली.

नयन पवार यांची मोठी मुलगी उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेचं काम करत आहे. तर दुसरी मुलगी इंजिनीअर आहे. तीन नंबरची असलेल्या नंदिताने तर दहावीत उत्तुंग यश मिळवत आपल्या आईच्या कष्टाचे सोनं केलं आहे.

नंदिताला 99.20 टक्के एकूण मार्क पडले असून त्यातील तीन टक्के हे उत्कृष्ट सायकलपटू या क्रीडा प्रकरातील आहेत. नंदिताला यंदाच्या वर्षी शाळेतून अष्टपैलू हा किताब मिळाला आहे. ती क्रीडा प्रकाराबरोबरच नाटक, नृत्य या कला प्रकारात देखील तरबेज आहे.

नंदिताला पुढे कॉमर्सचं शिक्षण घ्यायचं असून तिला सीए बनण्याची इच्छा आहे. कितीही अडचणी आल्या तरी आपली सीए बनण्याची इच्छा आपण पूर्ण करु, असा पूर्ण विश्वास नंदितला वाटतो. नंदिताच्या आईला आणि बहिणीला तिच्या या यशाचे मोठे कौतुक वाटत आहे.