मुंबई : म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. म्हाडाने थकीत सेवाशुल्कावरील तब्बल 400 कोटी रुपयांचे व्याज माफ केले आहे. अभय योजने अंतर्गत म्हाडाच्या वसाहतीत राहणार्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. एक एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गेली 21-22 वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार आम्ही थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरू शकता, अशी सवलत दिली आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्या 1 लाख 81 हजार रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. तसंच आता म्हाडात जाऊन रांगेत उभं राहून बिल भरायचं बंद होईल. ऑनलाइन प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या सेवा शुल्क भरू शकता, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
म्हाडाची ई बिलिंग प्रणाली सुरू
सेवाशुल्काचा भरणा करण्यासाठी म्हाडाची ई बिलिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या ई बिलिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. म्हाडाचे सदनिकाधारक ऑनलाईन घरबसल्या सेवा शुल्क भरू शकतात. जुलैपासून याचा लाभ म्हाडाचे सदनिकाधारक घेऊ शकणार आहेत. म्हाडाच्या 4 हजार 973 इमारतीत 14 लाख 6 हजार 382 रहिवासी राहतात, त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
नवीन ई-बिलींग प्रणाली बाबत..
ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.
- म्हाडाच्या mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर जावे. तसेच म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे.
- संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचे बोधचिन्ह असलेले पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावे.
- कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचे देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ
- स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील.
- देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.
- या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरुन सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे. गाळेधारकांना हव्या त्या पध्दतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे.
- देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती येथे कायम उपलब्ध राहणार आहे.