मुंबई : आज मुंबईतील तिन्ही उपनगरीय रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यरेल्वेसह पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेवर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे
मध्यरेल्वेवर आज 9 तासांचा विशेष मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. दिवा स्थानकात दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 9.15 ते संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसटीवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील लोकल सकाळी 8.29 ते संध्याकाळी 5.41 या वेळेत डाऊन स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच कल्याणहून सीएसटीकडे जाणाऱ्या अप फास्ट मार्गावरील लोकल ठाणे कल्याण दरम्यान स्लो मार्गावर चालवल्या जातील. अप फास्ट आणि डाऊन फास्ट मार्गावरील सर्व लोकल ठाणे-कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे सीएसटीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा सकाळी 10.11 ते दुपारी 3.29 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर पनवेलकडून सीएसटीच्या दिशेने रेल्वेसेवा सकाळी 10.29 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत बंद राहील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नलिंग तसंच ओव्हरहेड उपकरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.