मुंबई : राज्यामध्ये होऊ घातलेल्या महाआघाडीत मित्रपक्षांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान काही मित्रपक्ष या जागा वाटपावर खुश नसून जास्त जागा मिळाव्या याकरिता आग्रही असल्याचे समजले आहे. यावरून आघाडीत बिघाडी होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात होणाऱ्या महाआघाडीत पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ (जर प्रकाश आंबेडकर आघाडीत आले तर) आणि हातकणंगले मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी दिल्या जाण्याची शक्यता आहे.
या तीन जागा मित्र पक्षानं सोडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची तयार असल्याची देखील माहिती आहे. मात्र आरपीआय गवई गटाकडून राजेंद्र गवईयांनी अमरावतीच्या जागेची मागणी केली आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली आहे. यासाठी गवई तयार नसल्याचे समजते.
तर दुसरीकडे महाआघाडीतील देशपातळीवरील महत्वाचा चेहरा असलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागांची मागणी केली आहे. पण सहाच्या सहा जागा मिळाव्यात असा आग्रह नसून किमान समान कार्यक्रमाबाबत मात्र राजू शेट्टी आग्रही आहेत. कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, वर्धा, बुलढाणा, माढा या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितल्या होत्या. तर शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल अशा छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळणार आहे.
महाआघाडीबाबत आता निर्णय दिल्लीत होईल : अशोक चव्हाण
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीची राज्यातली चर्चा संपली असून महाआघाडीबाबत आता निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. महाआघाडीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून जी चर्चा झाली ती आम्ही पक्ष प्रभारींना सांगू, असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत चर्चा होईल. दिल्लीत राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर आता चर्चा होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
महाआघाडीत मित्रपक्षांना तीन जागा, बिघाडीची चिन्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 05:21 PM (IST)
राज्यात होणाऱ्या महाआघाडीत पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ (जर प्रकाश आंबेडकर आघाडीत आले तर) आणि हातकणंगले मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी दिल्या जाण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -