Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील डीकेटीई इचलकरंजी येथील महाविद्यालय आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काल शिवाजी विद्यापीठामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याची बाजू समजावून घेतली होती. मात्र, शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट युजीसीसोबत असल्याने यासंदर्भात माहिती घेऊन डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याची आश्वासन दिले होते. तसेच परीक्षेसंदर्भात सर्वस्वी निर्णय त्या स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले होते. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी घेतला होता.
या पार्श्वभूमीवर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डिकेटीई शिक्षण संस्था स्वायत्त आहे. त्यामुळे या संस्थेतंर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालयातंर्गत घेतल्या जातात. संस्था स्वायत्त असल्याने जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीनवेळा परीक्षा देण्याची परवानगी असते. परंतु, डिकेटीई तीनवेळा परीक्षा घेत नसल्याने विद्यार्थी नापास होऊन वर्ष वाया जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून तीनवेळा परीक्षा घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या