रत्नागिरी : नाणार रिफायनरीचं मढं हे जमिनीत गाढलं गेलेलं आहे. ते उकरुन काढण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेनं हा प्रकल्प रद्द केला असून आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे. शिवाय, जो कुणी शिवसैनिक नाणारचं समर्थन करताना दिसेल त्याचं वहाणेनं थोबाड फोडा, अशा शब्दात शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी नाणारबाबत शिवसेनेची भूमिका सागव्यातील जाहीर सभेत स्पष्ट केली. त्यानंतर आज राजापुरातील डोंगर तिठा येथे नाणार समर्थक जाहीर सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सभेत आता समर्थक शिवसैनिक देखील सहभागी होणार का? हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे आता ऐन शिमग्याच्या तोंडावर कोकणात नाणार रिफायनरीवरुन बोंबाबोंब सुरू झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. आमच्याकडे 8 हजार एकर जमिनधारकांची संमती असून नाणारसाठी आता जनमत वाढत आहे. कोकणच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका सध्या समर्थक घेत आहेत. यामध्ये सागवे जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्या यांचा समावेश आहे. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्या गटातील हे सारे लोक आहेत. याबाबत आम्ही आमदारांशी बोललो आहोत. पण त्यांची मजबुरी आहे, अशी प्रतिक्रिया समर्थक शिवसैनिकांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
खासदारांच्या इशाऱ्यानंतर देखील शिवसैनिक समर्थकांच्या सभेला जाणार?
दरम्यान खासदारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देखील आजच्या समर्थकांच्या सभेला शिवसैनिक जाणार का? गेले तर त्यांची संख्या नेमकी किती असणार आहे, याकडे सर्वाचं लक्ष आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेना वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. आम्ही काहीही चुकीचं करत नाहीत, अशी प्रतिक्रिया समर्थक शिवसैनिक देत आहेत.
'...तर गृहमंत्रालयाकडून चौकशी'
नाणारमध्ये सध्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिकांच्या जमिनी या परप्रांतियांना विकल्या जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना फूस लावली जात आहे. त्यांना फसवलं जात आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी ही वेळ पडल्यास गृहमंत्रालयाकडून केली जाईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सागवेतील शिवसेनेच्या जाहीर सभेत केली.
महाराजांच्या नावाचा वापर कशासाठी?
सध्या समर्थकांकडून छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरीचे मी जमीन मालक स्वागत करतो, असे फलक झळकावले जात आहेत. त्यामुळे महाराजांच्या नावाचा आता वापर करत लोकांना भावनिक आवाहन केले जात आहे का? महाराजांच्या नावाचा वापर करण्यामागे नेमकं कारण तरी काय? या साऱ्यामध्ये कोण आपली पोळी तर भाजू पाहत नाही ना? अशा अनेक प्रश्नांवर सध्या चर्चा सुरू झाली आहे.
आठ हजार एकर जमिनिची संमती कशी?
आमच्याकडे आठ हजार एकर जमीनधारक संमती द्यायला तयार आहेत. त्यांचं समंती पत्र आमच्याकडे आहे, असा दावा रिफायनरी समर्थक करत आहेत. दरम्यान, सातबारावरील कोणा एकाची संमती घेत किंवा घरातील कोणा एकाची संमती घेत सर्व जमिनधारकांची परवानगी कशी? असा सवाल निर्माण होतो. एकाची संमती म्हणजे घरातील किंवा सातबारावरील सर्वांची संमती मिळाली का? शिवाय, जर संमती मिळाली तर हे सारे संमती धारक आणि जमिन मालक आहेत कुठे? असा सवाल देखील केला जात आहे.
शिवसेनेनं रद्द केलेल्या नाणार रिफायनरीसाठी समर्थकांची सभा; समर्थक शिवसैनिक देखील राहणार हजर?
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
02 Mar 2020 09:45 AM (IST)
कोकणच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका सध्या समर्थक घेत आहेत. यामध्ये सागवे जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्या यांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -