राळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तसाठी उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न पुन्हा एकदा निष्पळ ठरले आहेत. अण्णांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी जवळपास तीन तास चर्चा केली. अण्णासोबत समाधानकारण चर्चा झाल्याचं दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं.


दोन्ही मंत्र्यांनी अण्णांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघालेला नाही. केंद्राच्या प्रस्तावावर समाधान न झाल्याने अण्णा उपोषणावर ठाम आहेत. स्वामीनाथन आयोगावर मंत्र्यांचा अभ्यास नाही, असा आरोप अण्णांनी केला आहे.


शेतीच्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी, सचिव आणि आपल्या बाजूच्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन चर्चा करावी. मात्र सरकारकडून दिशाभूल सुरू आहे, असं अण्णांनी म्हटलं आहे. लोकपाल आणि लोकायुक्त यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजूनच समाधान नाही. शेतीच्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री, सचिव आणि माझ्या बाजूचे तज्ज्ञ अशी एकत्र चर्चा घ्या, असं अण्णा म्हणाले.


"केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी याठिकाणी आलो आहे. अण्णांसोबत ज्या पद्धतीने आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यावरून आम्हाला खात्री आहे की अण्ण्यांच्या मागण्यावर लवकरच मार्ग निघेल. चर्चेचा तपशील केंद्राकडे पोहोचविण्यात येईल", अशी माहिती सुभाष भामरेंनी दिली.


अण्णांच्या लोकायुक्त आणि लोकपालच्या मागणीवर विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्र सरकारही आणि राज्य सरकारही सकारात्मक आहे. 28 तारखेला लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय होईल आणि 10 मार्चपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल. लोकपाल व लोकायुक्त याबाबत हजारे यांचे समाधान झाले असून, फक्त कृषिमूल्य आयोगाबाबत त्यांचे समाधान झाले नाही, ते उद्या दुपारपर्यंत होईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.


व्हिडीओ