नागपूर : अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवतीला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यावेळी तिच्या मदतीला धावून आला तो अवघा 24 वर्षांचा एमबीबीएसचा विद्यार्थी. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वरिष्ठांची मदत घेत विपीन खडसे या तरुणाने महिलेची सुरक्षित डिलीव्हरी केली.

विपीन नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. मात्र असं असतानाही या हुशार विद्यार्थ्याने ही गुंतागुंतीची प्रसुती पार पाडली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये 24 वर्षीय चित्रलेखा ही गर्भवती अहमदाबादला चढली. प्रवासादरम्यान तिला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यावेळी ट्रेन नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर होती. चित्रलेखाच्या नातेवाईकांनी वर्धा जंक्शनजवळ साखळी खेचून ट्रेन थांबवली. टीसी आणि गार्डने ट्रेनमध्ये डॉक्टर शोधण्यास सुरुवात केली.

विमान टेक ऑफ होताच प्रसुतीकळा, 42 हजार फूटावर बाळाचा जन्म


विपीनला ही गोष्ट समजली, मात्र ट्रेनमध्ये एखादा तरी डॉक्टर असेल, या विचाराने आधी तो शांत राहिला. मात्र ते पुन्हा मदत मागण्यासाठी आले, तेव्हा मी पुढे आलो, असं विपीन सांगतो.

चित्रलेखाजवळ मी पोहचलेलो तेव्हा तिचा प्रचंड रक्तस्राव झाला होता. माणुसकीच्या नात्याने प्रवाशांनी ती बोगी रिकामी केली होती. महिला प्रवाशांनी त्या कंपार्टमेंटची डिलीव्हरी रुम तयार केली होती, असं विपीनने सांगितलं.

'डोक्याऐवजी त्या बाळाचा खांदा आधी बाहेर आला होता. त्यामुळे ही प्रसुती गुंतागुंतीची झाली होती. थंड पाण्याच्या बॉटल्सनी मी तिचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. मी हा फोटो माझ्या वरिष्ठ डॉक्टरांना व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि मदत मागितली. त्यानंतर वरिष्ठ निवासी डॉक्टर शीखा मलिक यांनी फोनवरुन मला सूचना दिल्याने ही प्रसुती सुलभ झाली.' असं विपीनने सांगितलं.

नागपूरमध्ये ट्रेन दाखल होताच महिला डॉक्टरांच्या पथकाने चित्रलेखाला वैद्यकीय मदत दिली. त्यानंतर नव्या मात्या-पित्याने बाळासह पुढचा प्रवास केला, असं विपीन खडसेनं सांगितलं.