रायगड : गर्भवती पत्नीला 800 फूट खोल दरीत ढकलल्याची घटना रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये घडली आहे. नशीब बलवत्तर म्हणून ही महिला यातून बचावली. पोलिस आणि गिर्यारोहकांच्या पथकाने तिला सुखरुप बाहेर काढलं.


आरोपीचं विवाहित विजयासोबत प्रेमविवाह
सुरेश पवार आणि विजया पवार हे दाम्पत्य सोमवारी आपल्या मुलासह माथेरानला फिरायला आलं होतं. मंत्रालयात ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुरेश पवारचं विवाहित असलेल्या विजयाशी 9 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरेश आणि विजयाची आधी ओळख झाली, मग ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर सुरेशने विजयाचा मुलांसह स्वीकार केला होता

म्हणून पत्नीचा काटा काढण्याचं ठरवलं!
विजयाला पहिल्या नवऱ्यापासून तीन अपत्य आहेत. दोन मुलं चेन्नईतील हॉस्टेलमध्ये शिकत असून लहान मुलगा तिच्यासोबत राहतो. मात्र मला तुझ्या घरी घेऊन चल, अशी रट विजयाने लावली होती. त्यामुळे रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेश पवारने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. सुरेश विजयाला माथेरानला घेऊन गेला. तिथे सुरेशने कड्यावरच्या गणपती पॉईंटपासून तिला 800 फूट खोल दरीत ढकललं.

आदिवासी, गिर्यारोहक पथकाने महिलेला वाचवलं
महिला जिवंत असून ती जखमी अवस्थेत असल्याचं समजल्यानंतर आदिवासी तरुण आणि वनविभागाच्या शिपायांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. परंतु विजया कड्याच्या मधोमध अडकल्याने तिचा बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीमला बोलावलं. आदिवासी तरुणांच्या मदतीने रेस्क्यू टीमने गर्भवती विजयाला खोल दरीतून सुखरुप बाहेर काढलं.

पतीविरोधात तक्रार देण्यास पत्नीचा नकार
विजयाला जबर दुखापत झाल्याने तिला कर्जत इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र विजयाने आरोपी सुरेशविरोधात कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला. पण नेरळ पोलिसांकडे जबाब नोंदवताना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सुरेशने असं का केलं, याचा जाब विचारायचा आहे, असं विजया म्हणाली.

दरम्यान, पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेश पवारला अटक करण्यात आली आहे.