सोलापूर : ट्रकचालकाचा उद्दामपणा वाहतूक पोलिसाच्या जीवावर बेतल्याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. सोलापुरात चालकाने ट्रक अंगावर घातल्यामुळे वाहतूक पोलिसाला प्राण गमवावे लागले.


वाहतूक पोलिस गजानन ननवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालकाने रिक्षाला धडक देऊन पळ काढला. त्यामुळे ननवरे या ट्रकचा पाठलाग करत होते. मात्र ट्रकचालकाने पाठलाग करणाऱ्या गजानन ननवरे यांच्या अंगावरच थेट ट्रक घातला.

गंभीर जखमी झालेल्या ननवरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शहर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाचा पाच किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडलं. ट्रक पोलिसांच्या ताब्यात आहे.

वाहतूक पोलिसाच्या अंगावर कंटेनर घातला, शिसोदेंचा जागीच मृत्यू

काहीच दिवसांपूर्वी जळगावात कंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्यामुळे वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला होता. चाळीसगाव- औरंगाबाद रोडवर घडलेल्या घटनेत महामार्ग पोलिस कर्मचारी अनिल शिसोदे यांचा मृत्यू झाला होता.