नांदेड : पोलीस भरती घोटाळ्यात पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या भरतीमध्ये पुण्यात वानवडी येथे झालेल्या परीक्षेत 30 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका सोडवण्यात आल्याचं उघड झालं आहे.

घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली.

प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी तपासासाठी काल एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक एसआयटीचे प्रमुख आहेत. तर पोलीस निरीक्षकांऐवजी आता पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी आहेत.

फरार आरोपींच्या शोधासाठी अन्य चार पथकांचीही नियुक्ती काल करण्यात आली होती.

नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा

नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.

दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

संबंधित बातम्या :

नांदेड पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या?


साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडमध्ये घोटाळा उघड