मुंबई : प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी खासगी तसेच कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार या खासगी वाहनांना आता गर्दीच्या हंगामात एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.


यापुढे अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द केला जाईल. असंही ते यावेळी म्हणाले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

‘राज्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इत्यादी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीच्या हंगामामध्ये खासगी वाहतूकदारांकडून बरीच भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.’ असं रावते म्हणाले.

‘या खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल.’ असा विश्वासही रावतेंनी यावेळी व्यक्त केला.