धुळे : सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले धुळे जिल्ह्यातील जवान योगेश भदाणे यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे ह त्यांचं मूळगाव आहे. त्यांच्या पार्थिवार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


शहीद योगेश भदाणे यांचा आठ वर्षीय पुतण्या मोहीत याने अग्निडाग दिला. ‘भारत माता की जय’, ‘शहीद योगेश भदाणे अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

शहीद योगेश भदाणे यांची पत्नी पूनम, तसेच योगेश यांच्या माता-पित्यांच्या तिरंगा स्वाधिन करण्यात आला. लष्कर आणि पोलीस यांच्या वतीने शहीद योगेश भदाणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसेच शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद जवान योगेश भदाणे हे जम्मू-काश्मीरमध्ये 108 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये तैनात होते. बांदीपुरा भागात सीमेवर तैनात असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आलं. 2009 मध्ये योगेश भदाणे सैन्यात दाखल झाले होते.

योगेश भदाणे यांच्या कुटुंबात त्यांचे दोघेही मेहुणे लष्करात आहेत. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. या घटनेने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.