नाशिक: अहमदनगरमधील बहुचर्चित सोनई हत्याकांडप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर अशोक रोहीदास फलके पुराव्याअभावी निर्दोष सुटला आहे.
दोषींच्या शिक्षेवर 18 जानेवारीला सुनावणी होईल. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.
2013 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई इथे तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली होती.
सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) अशी हत्या झालेल्या तीन युवकांची नावे आहेत.
1 जानेवारी रोजी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिले होते. एकूण 53 साक्षीदारांच्या तपासणीनंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी दोष निश्चित करण्यासाठी 15 जानेवारी तारीख दिली होती. त्यानुसार आज आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले.
या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, केवळ परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींवर दोष निश्चित करण्यात आल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती.
इतकंच नाही तर तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते.
याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.
याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरलं आहे, तर अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
परिस्थितीजन्य पुरावे
या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, परिस्थितीजन्य पुरावे होते. त्याच्याच आधारे आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवलं जाणार आहे.
यापूर्वी कोपर्डी बलात्कार खून आणि नितीन आगे हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे यांची चर्चा झाली होती. कोपर्डी खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यामुळे तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तर नितीन आगे हत्याप्रकरणात साक्षीदार फितूर झाल्याने 9 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.