श्रीनगर : दिवाळीच्या पूर्वसंधेला पाकिस्तानने केलेल्या निंदनीय कृत्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला उत्तर देताना भारतीय जवानांनी गोळीबारात 7-8 पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना ठार मारले.


भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकचे सुमारे 10-12 सैनिक जखमी झाले आहेत आणि पाक लष्कराचे मोठ्या प्रमाणात बंकर व लाँच पॅड नष्ट करण्यात आले आहेत.


शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. त्यात तीन सुरक्षा कर्मचार्‍यांसह सहा जण ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने या ठिकाणांवर गोळीबार करत हल्ला केला.


पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात 4 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांची मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय सैन्य सर्व क्षेत्रांमध्ये चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.


भारताच्या प्रत्युत्तर दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या 6 ते सात सैनिकांच्या मृत्यूची नोंद आहे, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी आहेत, पाकिस्तानी गोळीबारात भारतीय लष्कराचे तीन जवान आणि एक बीएसएफचा सैनिकही ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन नागरिकही ठार झाले आहेत.



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील इझमर्ग येथे युद्धविराम कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. काही मिनिटांनंतर कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.




अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील सावजीन भागातही पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला.



आज सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या बाजूला असलेल्या चार सेक्टरच्या सीमाभाग आणि चौकींवर पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला. या महिन्यात आतापर्यंत पाकिस्तानी सैनिकांनी 24 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.