मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करताना रेल्वे रुळावर पडून टीसीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड, असं मृत टी.सीचं नाव असून कसारा उंबरमाळी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे.


अरुण गायकवाड शुक्रवारी सकाळी 9 वाजता पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्यासाठी कल्याण स्थानकात चढले होते. त्यानंतर त्यांनी कसारा स्थानकावरुन परत येण्यासाठी लोकल पकडली. त्यादरम्यान त्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली असता विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडलं. मात्र कसारा आणि खर्डीदरम्यान उंबरमाळी स्थानकाच्या सिग्नलवर गाडी थांबल्याने संधी साधून त्या प्रवाशाने पळ काढला.

या दरम्यान त्याचा पाठलाग करताना गायकवाड रेल्वे रुळावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अरुण गायकवाड मागील 20 वर्षांपासून मध्य रेल्वेच्या कल्याण विभागात टीसी म्हणून कार्यरत होते.

घटनेनंतर पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून टीसींना टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे टीसींवर दबाव असतो, असं एका वरिष्ठ टीसीने सांगितलं.