पुणे : पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजून या कार्यक्रमासाठी निमंत्रणच देण्यात आलं नसल्याचं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमीपूजन करणार आहे, असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक झाली. मात्र त्यांनी शरद पवारांना बोलावण्याबद्दल कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.
23 डिसेंबरलाच भूमीपूजन करणार : राष्ट्रवादी
भाजप हा सत्तेचा वापर करुन मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत चुकीचा पायंडा पाडत आहे. भाजप कार्यक्रमासाठी दोन स्टेज करुन केवळ राजकीय फायदा लाटण्यासाठी असा उद्योग करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
आम्ही विकास कामाबाबत राजकारण करणार नाही. शरद पवार यांच्या हस्ते 23 तारखेला सकाळी उद्घाटन होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
महापौर प्रशांत जपताप यांनी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.