आयकर विभागाकडून उल्हासनगर महापालिकेतील करदात्यांची चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 05:20 PM (IST)
उल्हासनगर : थकीत करापोटी तुम्ही महापालिकेत पन्नास हजारांपेक्षा जास्त कर भरला असेल तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. कारण आयकर विभागाने उल्हासनगर महापालिकेकडे पन्नास हजारांपेक्षा जास्त कर भरणाऱ्यांची नावं मागितली आहेत. उल्हासनगर महापालिकेने 843 करदात्यांची माहिती महापालिका आयुक्तांनी आयकर विभागाला दिली आहे. त्यात पन्नास हजार रुपयांपासून ते 25 लाख रुपये भरणाऱ्यांचा समावेश आहे. नोटाबंदी झाल्यानंतर जुन्या नोटा कर भरण्यासाठी स्वीकारल्या जात होत्या. त्यामुळे अनेकांनी आपल्याकडील जुन्या नोटांद्वारे कर भरणा केलाय. सध्या फक्त उल्हासनगरमधील करदात्यांची यादी मागितली असली तरी इतर महापालिकांमध्येही पन्नास हजारांपेक्षा जास्त कर भरणाऱ्यांची नावं मागितली जाऊ शकतात. आणि अशा लोकांना आयकर विभाग नोटीस बजावू शकतं.