कोल्हापूर : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने कळंबा कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन टेनिसबॉलमधून 15 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याआधी  तिघांनी कळंबा कारागृहात गांजाने भरलेले बॉल फेकले आहेत का? याचा शोध कोल्हापूर पोलीस करत आहेत.


कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारागृहात गांजा पोहोचण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील तिघांना अटक केले आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक केलेल्या तिघांची नावं आहेत.


जुना राजवाड्याचे कर्मचारी संदीप बेंद्रे यांना कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ तीन तरुण क्रिकेट खेळत असल्याची माहिती मिळाली. या तिघांकडे तीन टेनिस बॉल असल्याची देखील माहिती मिळाली. क्रिकेट खेळणाऱ्यांकडे एक ऐवजी तीन टेनिस बॉल कसे? ते कारागृहाच्या भिंतीची जवळ क्रिकेट का खेळत असावेत? अशी शंका बेंद्रे यांना आली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि कारवाईस सुरुवात केली.


पथकाने त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील टेनिसबॉल जप्त केले. हे बॉल कापून पाहिले तर त्यामध्ये गांजा भरून पुन्हा चिकटवण्यात आले होते. तिघांकडे कसून चौकशी केली असता ते कळंबा कारागृह असलेल्या कैद्याला देण्यासाठी गांजा आणल्याचे उघड झाले. प्रत्येक बॉलमध्ये पाच ग्रॅम गांजा या तिघांनी भरला होता. या तिघांकडून याआधी अशा पद्धतीने गांजा फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? याची चौकशी देखील जुना राजवाडा पोलीस करत आहेत.