पुणे : महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी  मर्दानी दसरा सोहळा नुकताच साजरा झाला. दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं खंडा तलवारीचे मर्दानी खेळ खेळून झाल्यावर या सोहळ्याची सांगता होते.




खंडेरायाची जेजुरी दसऱ्यादिवशी खेळवल्या जाणाऱ्या मर्दानी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. हे खेळ पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून भाविक जेजुरीत गर्दी करतात. शनिवारी दसऱ्यानिमित्त संध्याकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनासाठी काढण्यात आली. मार्तंड भैरवाचं मूळ स्थान असलेल्या कडेपठार मंदिरात उत्सवमूर्ती आणून त्याठिकाणी देवभेटीचा विलोभनिय सोहळा पार पडला.



या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे खंड्याचे मर्दानी खेळ. यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक दिवस भाविक, स्पर्धक तयारी करत असतात. अगदी 12 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे स्पर्धक खंडा तलवार उचलण्यासाठी आणि पेलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. तब्बल 42 किलोंची खंडा तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातानं उचलून धरण्याची स्पर्धा रंगते.



42 किलोंची खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी खंडेरायाचरणी अडीचशे वर्षांपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी गडावर परतल्यानंतर खंडा तलवार उचलली जाते. या मर्दानी दसऱ्याच्या खेळातून भक्त खंडोबारायाप्रती आपली श्रध्दा व्यक्त करतात.