अहमदनगर : रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यासाठी अहमदनगरच्या पाथर्डीत चक्क विद्यार्थीच रस्त्यावर उतरले. लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी हा निषेध मोर्चा काढला.

 
वसंतदादा पाटील विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून अवैध धंदे आणि रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाजतगात, लेझीम खेळत, मागण्यांचे फलक हाती धरुन हा मोर्चा काढण्यात आला.

 
शाळेच्या मार्गावरील सगळे अवैध धंदे आणि रोडरोमिओंचा बंदोबस्त करा, असं निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आलं. गेल्या काही महिन्यात अहमदनगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त होताना दिसला.