मुंबई : गेल्या पाच पिढ्यांपासून आम्ही कलेची सेवा करत आहोत, माझी आई लावणीच्या कलेतील गुरु होती. तिच्याकडून मला हा वारसा मिळाला. त्यामुळे तिने दिलेला हा कलेचा वारसा शेवटच्या श्वासापर्यंत जोपासणार असल्याची भावना प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी 'माझा कट्टा'वर व्यक्त केली.
माझा कट्ट्यावर बोलताना त्यांनी आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. 'मी या कलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे. कलेची सेवा करताना अनेक चढ-उतार पाहिले, आमच्या पुढच्या पिढीतील अनेकांनी वेगळे मार्ग निवडले आहेत. माझी एक नात डॉक्टर आहे, तर एक नातू इंजिनिअर आहेत. आता पुढच्या पिढीने वेगळा मार्ग निवडावा.' अशी इच्छा मंगला बनसोडे यांनी बोलून दाखवली.
स्टेजवरच डिलीव्हरी, अर्ध्या तासात पुन्हा मंचावर
कलेसाठी आयुष्य वेचलेल्या मंगलाताई गर्भवती असतानाची गोष्ट. त्यांचा नववा महिना भरत आला होता. मात्र त्या स्थितीतही त्यांनी मंचावर नृत्याला सुरुवात केली. नाचता नाचताच त्यांना प्रसवकळा येऊ लागल्या. मंचावरच काही गावकरी महिलांच्या साथीने त्यांची डिलीव्हरी झाली. विशेष म्हणजे प्रसुतीनंतर अवघ्या काही वेळातच त्या पुन्हा मंचावर आल्या आणि नृत्याविष्कार पुन्हा सादर केला.
'माझा कट्टा'तील महत्त्वाचे मुद्दे
आजकालच्या श्रोत्यांना जुन्या लावण्या आवडत नाही. त्यांना शांताबाई, बांगोसारखी गाणी आवडतात.
शिवडीतील बांगो गाण्यामुळे 22 हजार रसिक शांत झाले.
लावणीमध्ये चित्रपटातील कॉश्च्यूम मी आणले.
खासदार व्हायचं स्वप्न अपूर्णच राहिलं, अशी खंतही मंगला बनसोडे यांनी बोलून दाखवली.
महाराष्ट्र सरकारने कलाकारांचे थकीत अनुदान द्यावे
राज्य सरकारकडून विठाबाईंच्या नारायणगावतील स्मारकाची घोषणा झाली, मात्र अद्यापही काम सुरु नाही
गोव्यातील कार्यक्रमानंतर माझ्या श्रद्धांजलीचे बोर्ड पाहून आश्चर्य वाटलं, पण हे कुणीतरी खोचकपणे केलं होतं