Marathwada Rain Update: बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू झालाय.  पुढील पाच दिवस मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आलाय. पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ओढे नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यातही वाढ होत आहे. 


लातूर ,नांदेड, हिंगोलीत हलक्या सरी


दरम्यान पुढील तीन दिवस लातूर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असला तरी पुढील चार दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. 


आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट? 


हवामान विभागाने आज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. लातूर हिंगोली नांदेड हे तीन जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज छत्रपती संभाजी नगर जालना परभणी धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहणार असून तुरळक ठिकाणी वीरांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.


प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज काय?


प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


बीड जिल्ह्यात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी 


काल दिवसभर झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. काल रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने ओढे नाले ओसंडून वाहत होते. एका दिवसात सरासरी 27 मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस बीड तालुक्यात नोंदवला गेलाय.


हेही वाचा:


भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती झालाय? वाचा


Pune Rain Update: पुन्हा मुसळधार! पुण्यात पावसाचा आणखी दोन दिवस मुक्काम; अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज