Marathwada Rain alert: अरबी समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा  नैऋत्येकडे सरकल्यानं येत्या १२ तासात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं मराठवाड्याला रौद्ररुप दाखवले. हिंगोली, नांदेड, परभणीसह बहुतांश भागांना पावसानं झोडपले. दरम्यान, आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट दिलाय..


अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या चक्रीवादळाने राज्यात बेफाम पाऊस झाला. दुष्काळी मराठवाड्यातली कोरडी धरणं जिवंत झाली. विहिरी काठोकाठ भरल्या. काही ठिकाणी नद्यांना पूर येऊन शेती पाण्यात गेली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. दरम्यान, आता पुढील १२ तासांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय.


कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?


राज्यात मुसळधार पाऊस होत असताना मराठवाड्यात पावसानं दाणादाण उडाली आहे. हिंगोली, नांदेड, परभणीत पुराचा वेढा घातल्यानंतर आज हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


उर्वरित जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज


बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आज हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे. आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पुढील तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने x  माध्यमावरही अंदाज पोस्ट केला आहे. 


 




मराठवाड्यात पावसाने 3 मृत्यू 78 जनावरे दगावली


मराठवाड्यात पावसाने कहर केला असून गेल्या 24 तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. लातूरमध्ये पुरात एक जण वाहून गेला असून 78 जनावरे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यात दोन जण दगावली आहेत तर लातूरमधून एक जण वाहून गेलाय. 106 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. 


मराठवाड्यात पावसाचे रौद्ररूप


मराठवाड्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आलाय. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालंय. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  घरांची पडझड झाली आहे. बीड नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सखल भागात पाणी हळूहळू शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसानं रौद्ररूप धारण केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.


हेही वाचा:


मराठवाड्यात 'कोसळधार', मागील 24 तासांत 284 महसूल मंडळात अतिवृष्टी, 3 मृत्यू 78 जनावरे दगावली, सर्व माहिती एकाच क्लिकवर