Marathwada drought review meeting : मराठवाड्यात (Marathwada) नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू करा. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल त्याचबरोबर पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रशासनास दिले आहेत. तर आगामी काळात गरज भासल्यास पिण्याचे पाणी राखून ठेवण्याबाबतही मुंडे यांनी सूचना केल्या. मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने कृषिमंत्री मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मराठवाड्यातील सर्व लघु मध्यम आणि मोठ्या जलप्रकल्पांचे जलसाठे तपासून आगामी काळात गरज भासल्यास पिण्याचे पाणी राखून ठेवण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून त्याचबरोबर गाळपिर्याचा जास्तीत जास्त वापर करून आगामी काळात गरज पडू शकते या दृष्टीने जनावरांच्या चाऱ्याची ही सोय करून ठेवावी असेही संबंधितांना या बैठकीत मुंडेंनी निर्देश दिले. तर, अग्रीम पीक विमा असेल किंवा अंतरिम पीक विमा असेल याचा नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्याला मोठा आधार मिळतो. सध्याची मराठवाड्यावरील परिस्थिती ही संकटाची असून शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळावा यासाठी संबंधित सर्व पीक विमा कंपन्यांनी महसूल आणि कृषी विभागासोबत मिळून मंडळ आणि गावनिहाय पंचनामे येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करावेत, असे आदेश मुंडे यांनी दिले.
बैठकीत अनेक मंत्र्यांच्या सहभाग
मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती यावर नियंत्रण मिळवणे तसेच, या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे आदी नियोजन करणे यासंदर्भात शुक्रवारी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आ.सतिश चव्हाण तसेच कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे अधिकारी, पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा कंटिन्जन्सी प्लॅन तयार करा...
मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके संकटात आली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरापर्यंत जाऊन मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा कंटिन्जन्सी प्लॅन येत्या आठ दिवसाच्या आत तयार करून सादर करावा असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
'आमच्या देवाने आमचं ऐकले'; शरद पवारांच्या वक्तव्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंची प्रतिकिया