औरंगाबाद :  शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं असून,  अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान यावरून अजित पवार गटाच्या नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत आहे. तर, कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ''आमच्या देवाने आमचं ऐकले" असल्याचे मुंडे म्हणाले आहेत. 


दरम्यान यावर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, "शरद पवार जे बोलले त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. मात्र, आम्ही आमच्या देवाला इतकंच म्हणत होतो की, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या आणि आमच्या देवाने आमचं ऐकले आहे. त्यामुळे आम्ही आभार मानतो. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आहेत. देवाने आशीर्वाद दिला म्हणजे देव आजूबाजूला असतो. आमची प्रार्थना भगवंतांनी ऐकली, असल्याचं मुंडे म्हणाले आहेत. 


बीडमध्ये अजित पवारांची 27 ऑगस्ट रोजी होणारी सभा ही उत्तर सभा नाही. बीडच्या प्रश्नावर ही सभा आहे. कुठं कुणाला अडचण यावी, पक्षात फूट पडली नाही. वेगळा विचार म्हणजे पक्ष फुटला नाही. पक्षात बहुसंख्य लोकांची ही इच्छा होती आणि आमची मागणी मान्य केली, असल्याचे मुंडे म्हणाले. 


बाजारात येऊन नाफेडने कांदा खरेदी करण्याची मागणी...


नाफेड खरेदीत नव्या अटी नाही. 2410 रुपयाच्या भावाने कांदा खरेदी करणार असून, खरेदी सुरू झाली आहे. ज्या अटी पूर्वी होत्या, त्याच अटी आहे. त्यामुळे आता नव्याने कोणत्याही अटी नाही. तसेच वेगळी अशी अट नाही. राज्यात अनेक ठिकाणी कांदा खरेदी सुरु आहे. पण वाटते तशी आवक नाही, प्रश्न इतकाच आहे. बाजारात येऊन नाफेडने कांदा खरेदी करावी याबाबत मी पियुष गोयल यांच्यासोबत बोललं आहे. त्याबाबत संध्याकाळ पर्यंत उत्तर येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 


विभागीय आढावा बैठकीला सुरुवात 


मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीला मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे देखील उपस्थित आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अनिल पाटील,  गिरीश महाजन, संजय बनसोडे, तानाजी सावंत हे सहभागी झाले आहेत. सोबतच विभागीय आयुक्त, कृषी अधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इतर अधिकारी उपस्थित आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


कृषिमंत्री मुंडे घेणार मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा; औरंगाबादेत बोलावली बैठक