Marathwada Dam water Update: राज्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने पावसाचा जोर वाढतोय. दरम्यान, मराठवाड्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता 84.12% झालंय. मराठवाडा विभागातील धरणांमधील पाणीसाठा आता हळूहळू वाढू लागलाय. 


दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने दिलासादायक चित्र आहे.


जायकवाडी धरण 84.12%


मराठवाडा विभागातील हजारो गावांची तहान भागवणारे आणि सर्वाधिक झलक क्षमता असणारे जायकवाडी धरण 84.12 टक्क्यांनी भरल्याचं जलसंपदा विभागांना सांगितलं. जायकवाडी धरण क्षेत्रात एक जून पासून आतापर्यंत 462 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी एक जून 2023 दरम्यान झालेल्या पाऊस 155 मीमी एवढाच होता.  


बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 40 टक्क्यांवर 


बीड जिल्ह्यातील धरणं मागील वर्षीच्या तुलनेत यंदा  काही प्रमाणात अधिक भरली असल्याचं दिसून येत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दिनांक ( 1 सप्टेंबर 2024) रोजी मांजरा धरण 40.57% भरलं आहे. माजलगाव धरणात अजूनही पाणीसाठा शून्यावरच आहे. इतर धरणांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. 


हिंगोलीतील धरणांची काय परिस्थिती?


हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण आज 78.29 टक्क्यांनी भरले आहे. मागील वर्षी सिद्धेश्वर धरणामध्ये 45.93% पाणीसाठा होता. तर सर्वाधिक जलक्षमतेच्या येलदरी धरणात 41.87% पाणीसाठा नोंदवण्यात आलाय. मागील वर्षी हा पाणीसाठा 59.92% एवढा होता. अजूनही येलदरीत मागील वर्षाच्या तुलनेत जलतूट नोंदवण्यात आली आहे.


नांदेडचं निम्नमनार 100% विष्णुपुरी कुठवर?


नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक जलक्षमतेचे निम्नमनार धरण 100 टक्क्यांनी भरलं आहे. मागील वर्षी 52 टक्क्यांवर असणारे हे धरण पूर्ण भरल्यामुळे नांदेडकरांना दिलासा मिळालाय. विष्णुपुरी धरणात 85.58% पाणीसाठा नोंदवण्यात आला असून धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.


धाराशिवमध्ये दिलासादायक चित्र


धाराशिव मधील धरणांची परिस्थिती असून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून या जिल्ह्याची तहान भागत असल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. उजनी धरण 100 टक्के भरले असून धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा 35.7% तर सीना कोळेगाव अजूनही शून्यावर आहे. 


लातूर परभणीची परिस्थिती काय?


यंदा लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरण साठ ते 80 च्या घरात गेली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचे शिवनी धरण 79.22 टक्क्यांनी भरलं असून मागील वर्षीय धरणात केवळ 0.68% पाणीसाठा होता. खुलगापूर धरणात 82.51% पाणीसाठा झालाय. तर परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात 24.10% पाणीसाठा झाला आहे.