धुळे : मराठी भाषा दिनानिमित्त एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व बस्थानकांवर 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत ‘मराठी वाचन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात मुंबईत केली.
या सप्ताहादरम्यान प्रत्येक बस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. यासाठी एसटी महामंडळातर्फे ही दालनं उभी करण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितलं. विविध प्रकाशन संस्था पुस्तकं विक्री केंद यांच्या द्वारे प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात या कालावधीत पुस्तकं खरेदी करता येतील.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान दिलं पाहिजे. केवळ शासन स्तरावर मराठी भाषा गौरव दिन साजरा न होता तो जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्टाची लोकवाहिनी असलेली एसटी ही त्यासाठी योग्य माध्यम असल्यानं गेली तीन वर्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहानं साजरा होत असतो. यंदा देखील मराठी वाचन सप्ताहाच्या माध्यमातून एसटी महामंडळातर्फे अनोख्या पद्धतीनं मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे.
मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशानं या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
एसटीने राज्यात दररोज साधारण 70 लाख प्रवासी प्रवास करतात. मराठी वाचन सप्ताह निमित्त वाचनाचं दालन बस्थानकांमध्ये उपलब्ध होणार असल्यानं प्रवाशांसाठी ही एक अनोखी पर्वणीच असणार आहे. या मराठी वाचन सप्ताहाचा एसटीच्या प्रवासी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.