नागपूर : मला काढणं म्हणजे भाजपला मजबूत करण्याचा काही लोकांचा डाव असून, मी लवकरच पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी दिली. तसेच, मी काँग्रेस सोडणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. नागपुरात एबीपी माझाशी ते बोलत होते.


“मला पक्षातून निष्कासित केल्याचे मी फक्त मीडियातच वाचले आहे. मला काढणे म्हणजे भाजपाला सशक्त करण्याचा डाव आहे. तसेच, लवकरच आपण दिल्लीत जाऊन, हा संपूर्ण डाव नक्की काय आहे, ते पक्षश्रेष्ठींना सांगू.”, असे सतीश चतुर्वेदी म्हणाले.

सतीश चतुर्वेदी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राज्यात मंत्रिपदही त्यांनी भूषवलं होतं.

काँग्रेस उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणे आणि काँग्रेसविरोधात बंडखोर उमेदवारांना उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, या दोन कारणांचा ठपका ठेवत, सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. सतीश चतुर्वेदी हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्रीही आहेत.

सतीश चतुर्वेदींची हकालपट्टी केल्यानंतर नागपुरातील काँग्रेस कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. तसेच, पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कसे वागावं, यासंबंधी आचारसंहिता बनवावी, असा प्रस्तावही बैठकीत पारित करण्यात आला.