मुंबई : बुधवारची संध्याकाळ हादरली ती आत्महत्येच्या बातमीने. अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा, अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडच्या राहत्या घरी आत्महत्या केली. खुलता कळी खुलेना, डिअर आजो या कलाकृतीतून मयुरी आपल्याला दिसली आहेच. तिच्या नवऱ्याने अचानक हे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
33 वर्षीय आशुतोष हा नांदेडमधील एका सुखवस्तू कुटुंबातला होता. आजवर त्याने इचार ठरला पक्का, भाकर या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. जून जुलै या बहुचर्चित नाटकाची निर्मितीही त्याने केली. चार वर्षापूर्वी मयुरी आणि आशुतोषने प्रेमविवाह केला. लॉकडाऊन काळात गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघेही आपल्या गावी म्हणजे नांदेडला आले होते. नांदेड शहरातील गणेशनगर भागात त्यांचा बंगला आहे.
बुधवारी दुपारी आशुतोषची पत्नी मयुरी ही अशुतोषच्या आईसोबत खालच्या मजल्यावर गप्पा मारत बसली होती. त्यावेळी वरच्या बेडरूममध्ये अशुतोष झोपायला म्हणून गेला. बराचवेळ झाला तो उठला नाही म्हणून घरातल्यांनी दार वाजवलं. पण दाराला कडी होती. म्हणून खिडकीतून पाहिलं असता आशुतोषने गळफास लावलेला त्यांच्या कुटुंबियांना दिसला.
त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आशुतोषच्या जाण्याने नांदेडच्या कालाप्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे. आशुतोष याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. आशुतोषच्या पश्चात पत्नी मयुरी देशमुख, आई-वडील आणि एक भाऊ आहे.