Ravindra Mahajani :  ज्येष्ठ सिनेअभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि चाहते उपस्थित होते. एका हरहुन्नरी कलाकाराचा विचित्र शेवट झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या (Death) राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. किमान दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


महाजनी तळेगाव दाभाडेतील घरात एकटेच राहायचे. दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांच्या हे लक्षात आलं आणि त्याच्या मृत्यू झाल्याचं कळलं. महाजनी यांच्या मृत्यूनंतर राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. रवींद्र महाजनी यांनी 1970 साली मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार एन्ट्री केली. देखणा हिरो म्हणून दोन दशकं त्यांनी गाजवली. जवळपास वीस चित्रपटातून त्यांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अलिकडेच महाजनी यांनी पानिपत चित्रपटात मल्हारराव होळकरांची भूमिका ही साकारली होती. मात्र त्यानंतर पडद्यावर ते फारसे दिसले नाहीत.  


अनेकांकडून हळहळ व्यक्त


त्यांच्या अशा अकाली एक्झिटमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.  मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रवींद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. 'देवता' या  चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या 'खेळ कुणाला दैवाचा कळला?' या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत  आहे, अशा शब्दात आपल्या भावना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्य़क्त केल्या आहेत. 


77व्या वर्षी एकटेच का राहत होते?


मागील काही वर्षांपासून रवींद्र महाजनी हे तळेगाव दाभाडेतील घरात एकटेच राहत होते. त्यांचं कुटुंब पुण्यात राहत होतं. मुलगा गश्मीरदेखील पुण्यात राहतो. त्यांच्या निधनाची माहिती कळल्यावर कुटूंब तळेगावातील घरी दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या शरीराची वाईट अवस्था झाली होती. त्यानंतर त्यांचं पुण्यातील ससून रुग्णालयात पोस्ट मार्टम करण्यात आलं. त्याचे रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होईलच मात्र रवींद्र महाजनी हे 77व्या वर्षी एकटेच का राहत होते? कुटुंबातील कोणीच त्यांच्यासोबत का नव्हतं? शेवटच्या तीन दिवसांत कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.