Dilip Walse Patil : राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट काही आमदारांसह वेगळा होऊन शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सामील झाल्यानंतर आठ दिवसांनी, कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील माध्यमांसमोर भावुक झाल्याचे सर्वांनी पाहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे जाहीररित्या सांगितले देखील.
समजा शरद पवार यांनी आपल्या लाडक्या शिष्याला आणि मानस पुत्राला भेटीची वेळ दिली आणि भेटीमध्ये सविस्तर बोलणे झाल्यावर पक्ष शिस्तभंगाच्या चुकीबद्दल माफ केले तर, आता या क्षणाला दिलीप वळसे-पाटील अजित पवार गटापासून फारकत घेत पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुनर्प्रवेश करत यूटर्न घेतील का? आणि यूटर्नसाठी हीच योग्य वेळ आहे का? हा ज्वलंत प्रश्न सध्या चर्चेत आहे?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून सलग तब्बल सात वेळा निवडून आलेले आमदार, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीज तुटवड्यामुळे मोठे संकट घोंगावत असताना, शेतकरी त्रासलेला असताना राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे-पाटलांना ऊर्जा या कमालीच्या आव्हानात्मक खात्याची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांच्या कौशल्याने ती अवघड जबाबदारी स्वतःची बदनामी होण्याची भीती न बाळगता त्यांनी लिलया पेलली आणि देशातला एक यशस्वी ऊर्जामंत्री म्हणून नावलौकिक देखील मिळवला.
महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून हेडमास्तरकीची कारकीर्द वळसे-पाटलांनी गाजवली. विधानसभा अध्यक्षपदाची ताकद काय असते ते वळसे-पाटलांनी आपल्या अष्टपैलू संसदपटू असलेल्या अनुभवातून ग्लोरीफाय केले. माळीण दुर्घटनेचे काटेकोर आणि बारकाईने डिझास्टर मॅनेजमेंट करून, नेस्तनाबूत झालेल्या माळीणचे योग्य ते पुनर्वसन करून 'जबाबदार पालकाची' भूमिका त्यांनी बजावली. त्याचे देशभर कौतुक झाले. त्यावेळी आंबेगाव वासियांनी संवेदनशील आणि खरा देव माणूस अनुभवला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची प्रचंड बदनामी झालेली असताना राष्ट्रवादीकडे अनुभवी आणि क्लीन इमेज फेस हे वळसे-पाटील आघाडीवर होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीच्या काळात मशिदींवरचे भोंगे आणि सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठण सारख्या कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटनांना थोपवत शांत डोक्याने महाराष्ट्राचे गृह मंत्रालय वळसे-पाटलांनी हॅण्डल केले.
पक्षाकडून मिळालेल्या संधीचे सोने करत वळसे-पाटील सर्व सामान्यांच्या हितासाठीच झटले. शरद पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत जी जी आव्हानात्मक जबाबदारी सोपवली, ती ती जबाबदारी वळसे-पाटील यांनी मोठ्या शिताफीने पार पाडली आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा देखील नावलौकिक उंचावला गेला, ही वस्तुस्थिती आहे. शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी 'अजून काय पाहिजे'? असा सवाल करून सोशल मीडिया पोस्ट करत वळसे-पाटलांवर टीका केली होती. याला फारसे महत्व न राहता त्या टीकेचे उत्तर यापूर्वीच वळसे-पाटील यांच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डने दिले आहे.
दिलीप वळसे-पाटलांना शरद पवार या आपल्या वस्तादाच्या डावांचा अभ्यास जवळून आणि बारकाईने जरी अभ्यास असला, तरी आपला वस्ताद आपल्या विरोधात कोणता ठेवणीतला डाव टाकून आपल्याला आसमान दाखवेल याची धास्ती या मुरब्बी पठ्ठ्याला आता असू शकत नाही? या पठ्ठ्याला राजकारणातील आपल्याच वस्तादा सोबत घेतलेला पंगा अंगाशी येईल अशी भीती नक्कीच असू शकते.
दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव मतदारसंघातील जनतेला शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाण्यामागचे जे कारण सांगितले , तो डिंभे पाणी प्रश्न आंबेगाववासियांना सखोल समजावून सांगण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल का? आणि जरी कसरत करत पुरेसा वेळ मिळाला तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल का? ही शंका पुसली जात नाही. त्यांनी जलद गतीने गावभेट दौरे करून आंबेगाव वासियांना समजावून सांगितल्यानंतर देखील, शरद पवार यांचे कट्टर चाहते आणि भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची चीड असलेले मतदार दिलीप वळसे-पाटलांना मतदान करतील का? याची सध्या तरी काही शाश्वती देता येत नाही.
रविवारी 9 जुलैला मंचर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये आणि शेतकरी मेळावा झाल्यानंतर, तसेच काही मोजक्या युवा कार्यकर्त्यांशी बोलताना आणि त्यानंतर ज्येष्ठ व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत वळसे-पाटील यांची बैठक झाली. त्यामध्ये घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाबाबत सखोल चर्चा झाली. दिलीप वळसे-पाटील यांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता आणि तणाव यावेळी स्पष्ट जाणवत होता.
सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण देवदत्त निकम यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात वळसे-पाटलांची मोलाची भूमिका होती. तोच आपला कट्टर चेला आपल्यापासून दूर का गेला? कुणा-कुणा मुळे गेला? वळसे-पाटील यांच्यापासून दूर जाऊनही मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून देवदत्त निकम पुन्हा निवडून का आणि कसे आले? आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या थेट आशीर्वादाने आपल्याच विरोधात आपला शिष्य का उभा राहणार? याचं आत्मचिंतन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी निश्चितच करून त्याचा खरा अहवाल वळसे-पाटलांना सादर करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या नव्या समीकरणांनुसार (मूळ) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील हे आता एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल झाल्याने आगामी लोकसभा निवडणूक आढळराव-पाटील ( शिंदे गट ) विरुद्ध मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी थेट लढत शिरूर मधून रंगेल. यावेळी वळसे-पाटलांना तटस्थ भूमिका न घेता कुठल्यातरी एका उमेदवाराचा ठामपणे प्रचार करावा लागणार आहे. त्यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांच्या रूपाने शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणायचे का शिवसेना ( शिंदे गट ) - भा.ज.पा आणि अजित पवार गटाचा उमेदवार म्हणून युती धर्म पाळत आढळराव-पाटलांचा प्रचार करायचा हा देखील मोठा पेच प्रसंग वळसे-पाटलां पुढे असेल. आढळराव-पाटील जर राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला नुकत्याच झालेल्या मंचर बाजार समितीमधून निवडून आणण्यात मदत करत असतील तर विधानसभेच्या निवडणुकीत त्याच उमेदवाराला सर्वतोपरी मदत करून वळसे-पाटलांवरचा जुना राजकीय राग काढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत.
आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा रोष, मतदारांची नाराजी आणि अति महत्वाकांक्षी असलेल्या विरोधकांना तोंड देण्यात वळसे-पाटलांना जंग जंग पछाडावं लागेल हे नक्की. शरद पवार साहेबांनी मोठ्या मनाने जर माफ करून पुन्हा आंबेगाव तालुक्यातून संधी दिलीप वळसे-पाटलांनाच द्यायची ठरवले, तरी देखील दिलीप वळसे-पाटलांसमोर सर्वात मोठे चॅलेंज, आपली डॅमेज झालेली इमेज पुन्हा पॅचअप करण्याचे असेल. तसेच आपली इमेज अधिकची बिल्टप करण्याचे हे मोठे आव्हान असेल आणि त्याच्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागेल हे निश्चित.
राजकारणाचे कुटील डावपेच कधीच न खेळलेल्या, स्वभावाने प्रेमळ आणि मितभाशी असलेल्या, कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या साध्या-सरळ किरणताई दिलीप वळसे-पाटील यांना महिला वर्गाच्या मनातले हेरून आणि वळसे-पाटलांची लेक पूर्वा वळसे-पाटलांना ग्रामीण तरुणाईची स्पंदने ओळखून आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात फ्रंट फूट वरती उतरून लढावे लागेल.
वळसे-पाटील यांना एससी, एसटी, ओ.बी.सी आणि मुस्लिम मतांसाठी देखील थोडी कसरत करावी लागू शकते. त्याचे कारण छगन भुजबळ हे काही अजितदादांची साथ सोडतील असे वाटत नाही, त्यामुळे माळी समाज्यासह छगन भुजबळ यांना मानणारा ओ.बी.सी समाज हा संभ्रमावस्थेत जाऊ शकतो. तसेच मागासवर्गीय समाज हा देखील भा.ज.पा. सोबत गेल्याने नाराज असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाच्या कट्टर हिंदुत्ववादी आणि देवेंद्र फडणवीस या कॉन्ट्रावर्शियल भा.ज.पा.च्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने मुस्लिम मतदार कमालीचा चिडलेला असून, नाराज देखील झालेला आहे. आंबेगाव तालुक्यातील मुस्लिम मतदार आपल्या नेत्याचा हा निर्णय स्वीकारेल की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा राग करून त्यांच्या सरकारमध्ये गेलेल्या आपल्या नेत्याला नाकारेल. हे मुस्लिम मतदार उघड बोलून दाखवणार नाही. मतदानाच्या वेळी ते तालुक्याच्या भाग्यविधात्याला झुकते माप देतात की शरद पवारांनी दिलेल्या नव्या चेल्याच्या पारड्यात आपले मतदान टाकतात याच्यावर आंबेगावच्या मताधिक्याची गणितं अवलंबून असतील.
आंबेगाव तालुक्यात फार मोठे हाय प्रोफाईल मुस्लिम नेतृत्व अद्याप निर्माण होऊ शकलेले नाही. त्यामुळे मुस्लिम मतदारांना आपला पाण्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी वळसे-पाटलांना खूप कष्ट घ्यावे लागतील. शरद पवार यांच्यावर वर्षानुवर्षे प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मने वळवण्यासाठी आणि त्यांची एक गठ्ठा मते मिळवण्यासाठी स्वतः दिलीप वळसे-पाटील यांना त्यांच्याशी सुसंवाद साधावा लागेल.
तसेच सोशल मीडियावरील वाक युद्धासाठी आणि डावपेचांसाठी कालबाह्य सल्लागारांना बाजूला सारून नव्या दमाच्या नव्या जोमाच्या युवकांना आणि माध्यम क्षेत्रात तज्ञ असलेल्या व्यक्तींची मोट बांधून एखादी वॉर रूम सक्रिय करावी लागेल ! मतदाराचा माईंड सेट बनवण्यासाठी सोशल मीडिया किती प्रभावी आहे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सोशल मीडिया टीमची नव्याने बांधणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
समजा दिलीप वळसे-पाटलांची घर वापसी झालीच तर अजितदादा पवार हा आपला खंबीर साथीदार आणि हुकमी एक्का माघारी परतल्यानंतर काही शांत बसतील असं वाटत नाही. अजितदादांच्या दबंग राजनीति मधून त्यांच्या गटातून अति महत्त्वाकांक्षी एखाद्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या विरोधकांना या ना त्या मार्गाने ताकद देऊन दिलीप वळसे-पाटलांचा मनस्ताप वाढवणार नाहीत याची काही खात्री देता येत नाही.
आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे आणि तालुका महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जरी सांगत असले की 'आमचे साहेब दिलीप वळसे-पाटीलच', तरी देखील विधानसभा निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा घड्याळाचे चिन्ह नक्की कोणाच्या पदरी असेल हे आत्ताच काही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मनातलं खरे काय ते हेरण्यासाठी वळसे-पाटलांना एक वेगळी इंटेलिजन्स सिस्टीम डेव्हलप करावी लागेल !
शरद पवार ऐन वेळेला कोणता डाव टाकतील याचा काही नेम नाही. त्यामुळे आता निर्णय काय घ्यायचा? मागील 40 वर्षांच्या विकास कामांचा डोंगर आणि स्वतःची निष्कलंक प्रतिमा अशी जमापुंजी घेऊन दबंग अजितदादांच्या नव्या महायुतीच्या बुलेट ट्रेनमधून सुसाट निघायचे की , अजित दादांना 'जय महाराष्ट्र' करत पुन्हा आपल्या वस्तादाचा हात पकडायचा हा पेच दिलीप वळसे-पाटलांच्या मनात द्वंद्व करून राहिला आहे.
पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत मंत्रिपद उपभोगायचे आणि नंतर जे काय होईल ते बघायचे असा राजकारणातला जुगार खेळणाऱ्यापैकी व्यक्तिमत्व दिलीप वळसे-पाटील निश्चितच नाहीत. दिलीप वळसे-पाटलांचा कार्यकर्ता म्हणून कॉलर टाईट करून मिरवणारा कार्यकर्ता तसेच राज्यभरातील दिलीप वळसे-पाटलांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तो दिलीप वळसे-पाटलांच्या राष्ट्रवादीतील यूटर्नची आतुरतेने वाट बघत आहे.
अडचणीच्या काळात बापाला सर्वाधिक गरज मुलाची असते. मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी. अशा संघर्षाच्या काळात शरद पवारांचे मानसपुत्र दिलीप वळसे-पाटील यांच्या मनाला यातना होत आहेत. राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या सर्वात कठीण काळातले हे मोठं संकट आहे आणि या संकट काळात दिलीप वळसे-पाटलांसारख्या स्पेशलाईज डिझास्टर मॅनेजरची शरद पवार यांना आणि पक्षाला आता खरी गरज आहे.
हीच ती वेळ आहे, सत्तालोलूप मित्रांपेक्षा ज्यांनी नाव, पद, ओळख दिली त्या ‘बापा’ सोबत खंबीरपणे उभं राहण्याची. माळीणच्या दुर्दैवी घटनेच्या वेळी पहाडा सारखा खंबीर उभा राहणारा हा लोकनेता लोकशाहीसाठी, शरद पवारांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार का? हा प्रश्न जनमानसाच्या हृदयातील आहे.