मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स झळकायला लागले आहेत. मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.


'हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा' असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.



दोनच दिवसांपूर्वी हाती आलेल्या गुजरातच्या निकालामध्ये भाजपला 99 जागांवर आपलं वर्चस्व राखता आलं. मात्र भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपला 150 जागा मिळतील असं भाकित वेळोवेळी केलं होतं. त्यामुळे मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 80 जागा काबीज केल्या आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी मोदींना बालेकिल्ल्यात हादरे बसले आहेत.