अहमदनगर : खर्ड्यातील नितीन आगेच्या हत्या प्रकरणी बुधवारी तेरा फितूर साक्षीदार न्यायालयात हजर होणार आहेत. न्यायालयाने तेरा फितूरांना नोटीस बजावून 20 तारखेला हजर राहण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी अकरा तारखेलाच 13 फितूर साक्षीदारांना नोटीस बजावलीय. या नोटीसवर बुधवारी तेरा फितूर साक्षीदार आपलं म्हणणं मांडतील.
नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर 164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र 13 साक्षीदार फितूर झाले आहेत.
शिक्षक बाळू गोरे, रमेश काळे आणि साधना फडतरे आणि शिपाई विष्णू जोरे यांच्यासह तेरा जण फितूर झाले. तर नितीनचे आई, वडील, दोन बहीण आणि पंचनामा करणारे तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अधिकारी हे सरकारच्या बाजूने राहिलेत.
त्यामुळे 13 फितूर साक्षीदारांना नोटीस बजावून बुधवारी हजर राहण्यास सांगितलं आहे. त्यानुसार सदाशिव होडशीळ, विकास डाडर, रमेश काळे, रावसाहेब सुरवसे, लखन नन्नवरे, बबलू जोरे, विष्णू जोरे, सदाशिव डाडर, साधना फडतरे, राजेंद्र गिते, अशोक नन्नवरे, हनुमंत मिसाळ, राजू जाधव यांना नोटीस बजावण्यात आलीय.