ठाण्यात तरुणींकडून मराठा मोर्चाच्या निवेदनाचं वाचन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल




ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध पक्षातील नेत्यांची मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजन विचारे, खा. श्रीकांत शिंदे मोर्चात सहभागी झाले आहेत.




ठाण्यात जिजाऊ वंदनाने मराठा मूकमोर्चाला सुरुवात



ठाण्यात मराठा समाजाचा एल्गार, मोर्चेकऱ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात



ठाणे : मराठा क्रांती मूक मोर्चाच लोण ठाण्यापर्यंत येऊन पोचलं आहे. आज ठाण्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता हा मोर्चा सुरु होईल.

ठाणे शहरातील तीन हात नाक्यापासून सेंट्रल पार्क मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ठाण्यासह नवी मुंबई, भिवंडी, पालघर तसंच कल्याण परिसरातील मराठा समाजाचा सहभाग असेल.

शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

ठाण्यातील मराठा मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक मराठा मोर्चामुळे रद्द करण्यात आला आहे. तसंच मध्य रेल्वेकडून 40 जादा लोकलही धावणार आहेत.

चिपळूणमध्ये मराठा एल्गार :

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण मध्येही आज मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. चिपळूणमध्ये पवन तलाव ते प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल. या मोर्चामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मराठा मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापुरातून मोर्चेकरी चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.