बारामती : राज्यभरात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यातूनच ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. त्याचवेळी अनेकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचा पर्याय निवडला. या पार्श्वभूमीवर बारामती ते मुंबई अशी ‘मराठा संवाद यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यासह सामाजिक एकोपा रहावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
गेल्या काही दिवसात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु लागला आहे. त्यातच या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं, तर अनेकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. या पार्श्वभूमीवर बारामतीतील नाना सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मराठा संवाद यात्रा’ या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. ही यात्रा बारामतीत सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजात जनजागृती करुन त्यांना आत्महत्या आणि हिंसक आंदोलनापासून परावृत्त केलं जाणार आहे.
मराठा समाजाने आजवर काढलेले सर्वच मोर्चे शांततेच्या मार्गानेच पार पडले. मात्र त्याला काही समाजविघातक प्रवृत्तींनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढील काळात समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सलोखा कायम राहावा यासाठी सर्वच घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संवाद रथाच्या माध्यमातून 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रा आयोजित केली असल्याचं नाना सातव यांनी सांगितलं.